कायदा आणि वैद्यकीय व्यवसाय : (७) केस पेपर :

 


मुन्नाभाई एम. बी. बी. एस. या चित्रपटात जेंव्हा अत्यवस्थ रुग्णाला आणले जाते त्यावेळी मह्त्वाचा विषय पुढे आला; आधी ट्रीटमेंट का आधी केस पेपर? आणिबाणीच्या परिस्थितीत रुग्णाला आधी उपचार दिले जात असले तरीही किमान एका कोर्‍या कागदावर रुग्णाची माहिती लिहिली जाते. अत्यवस्थ नसल्यास मात्र कोणत्याही दवाखान्यात अथवा रुग्णालयात गेल्यावर पहिल्यांदा केस पेपर करायला लागतो.

का करायला लागतो केस पेपर?

मॅक्जिबॉनी च्या व्याख्येनुसार केस पेपर म्हणजे म्हणजे रुग्णाबद्दलचा वैद्यकीय, शास्त्रीय, प्रशासकीय आणि कायदेशीर दस्तावेज असून त्यामधे "रोगनिदान आणि उपचाराचे समर्थन करणारी पुरेशी माहिती" आणि रुग्णाबद्दलच्या घटना क्रमाने नोंदवलेल्या असतात. याचाच अर्थ असा की डॉक्टरांनी कोणत्या रुग्णावर कोणते उपचार का केले याची क्रमवार माहिती केस पेपरवर नोंदवणे अपेक्षित आहे. अतिदक्षता विभागात आलेल्या अत्यवस्थ रुग्णावर उपचार दिल्यानंतर का होईना डॉक्टरांनी केसपेपरवर नोंदी करणे कायद्याने बंधनकारक आहे.

पुढ्च्या वेळी रुग्ण उपचारांसाठी दवाख्यान्यात अथवा रुग्णालयात आल्यास केस पेपर वरुन पूर्वी काय आजार होता, काय उपचार केले इत्यादी माहिती दुसर्‍या डॉक्टरांनाही मिळू शकते. केस पेपर वरून मिळवलेली माहिती, रुग्णाच्या गोपनीयतेची काळजी घेऊन शास्त्रीय संशोधनासाठी उपयोगी ठरते. रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णाचे देयक तयार करण्यासाठी केस पेपरवरील उपचारांचा तपशील आवश्यक असतो. उपचारांसंबंधी पुढे काही वाद निर्माण झाल्यास न्यायालयात केस पेपरला कायदेशीर दस्त ऐवज म्हणून अनन्यसाधारण महत्व आहे कारण कोणताही वाद निर्माण होण्यापूर्वी डॉक्टरांनी केलेल्या रुग्णोपचारांसंबंधीच्या नोंदीवरून न्यायालयाला आजार आणि उपचारांसंबंधी अनुमान बांधता येते. न्यायाधीश डॉक्टर नसल्यामुळे केस पेपर एखाद्या तज्ञाला दाखवून त्याचे मत विचारता येते आणि योग्य निर्णय देता येतो.

केस पेपर वर डॉक्टर / दवाखाना / रुग्णालयाचे नाव व पत्ता छापलेला असतो. पहिल्या भेटीच्या वेळी रुग्णाचे नाव, पत्ता, दूरध्वनी क्रमांक, ईमेल, आधार क्रमांक, वय / जन्मतारीख, वजन इत्यादी रुणाला ओळखण्यासाठी आवश्यक बाबींची नोंद केली जाते. रुग्णाच्या तक्रारी, तक्रारींचा क्रमवार इतिहास आणि आढळलेले दोष यांच्यावरुन केलेले रोगनिदान यांची नोंद असावी लागते. रोगनिदानाच्या पुष्टीसाठी तपासणीचे निष्कर्ष आणि आणखी काही तपासण्या आवश्यक असल्यास त्यांची नोंद केली जाते. प्राथमिक रोगनिदानानुसार दिलेले औषधोपचार आणि आणि रुग्णास दिलेला सल्ला नोंदवल्यावर त्या भेटीसाठीचा केस पेपर पूर्ण होतो. पुढील भेटीच्या वेळी त्या दिवशीच्या तारखेला मागील उपचारांच्या फायद्याचा आढावा घेऊन केलेल्या तपासण्यांचे अहवाल विचारात घेता उपचारांमधले बदल नोंदवले जातात. अश्या रितीने उपलब्ध माहितीनुसार उपचारात बदल करत रुग्णाला आराम पडेपर्यंत सर्व नोंदी या केस पेपर वर असतात.

केस पेपर पूर्ण केलेला असावा. सुवाच्य नाही पण वाचता येण्यासारख्या अक्षरात लिहिलेला असावा अशी अपेक्षा आहे. डॉक्टरांकडून अशी अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे असा विनोद आपण बर्‍याच वेळा ऐकतो, पण वाचताच न येणार्‍या केस पेपरचा कोणाला काय उपयोग? रुग्णा संबंधीच्या बाबतच्या सर्व सत्य बाबी या केस पेपर वर दिनक्रमानुसार असाव्यात आणि त्याच्यावर डॉक्टरांची स्वाक्षरी असावी अश्या अपेक्षा आहेत. एखाद्या ठिकाणी खाडाखोड केल्यास तेथेही स्वल्प-स्वाक्षरी करणे गरजेचे आहे.

एखाद्या रुग्णाने डॉक्टरांकडे केस पेपरची प्रत मागितल्यास लेखी विंनंती मिळाल्यापासून ७२ तासांमधे त्याची प्रत रुग्णाला देणे बंधनकारक आहे. प्रतीसाठी वाजवी रक्कम रुग्णालयाला आकारता येईल. केस पेपरवर रुग्णाची मालकी असून डॉक्टर हा केसपेपरचा फक्त ट्र्स्टी आहे अशी कायद्याची भूमिका आहे.

डॉ. राजीव जोशी,
एम. बी. बी. एस, एम. डी. , एल. एल. बी.
बालरोगतज्ञ आणि न्यायवैद्यकीय सल्लागार.

Comments

Popular posts from this blog

कायदा आणि वैद्यकीय व्यवसाय : (६) :संमतीपत्र

कायदा आणि वैद्यकीय व्यवसाय (१४) : ग्राहक संरक्षण कायद्याचे फायदे आणि तोटे.

कायदा आणि वैद्यकीय व्यवसाय : (१०) ग्राहक संरक्षण कायद्याचे रुग्णांना होऊ शकणारे फायदे आणि तोटे