कायदा आणि वैद्यकीय व्यवसाय : (४) तज्ञ
कायदा आणि वैद्यकीय व्यवसाय : (४) तज्ञ
मागील लेखात डॉक्टरांच्या नावनोंदणी बद्दलची माहिती सांगीतल्यावर काही मित्रांनी वैद्यकीय परिषदेमधे नोंदणी कशी तपासणार असा प्रश्न विचारला. डॉक्टरांच्या प्रिस्क्रिपशन वर त्यांची पदवी आणि नोंदणी क्रमांक छापलेला असणे अपेक्षित आहे. एम. बी. बी. एस डॉक्टरांची नोंदणी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल कडे केली जाते आणि त्यांच्या संकेत स्थळावर नोंदणीक्रमांक टाकून डॉक्टरांबद्दलची माहिती तपासता येते. येथे मी माझ्या नोंदणीचे चित्र दिले आहे. आयुश शाखांतील वैद्यकीय व्यावसायिकांच्या माहितीसाठी खालील संकेतस्थळावर माहिती मिळू शकेल.
पदव्युत्तर प्रशिक्षण घेतले असल्यास विद्यापीठाकडून मिळालेली पदव्युत्तर पदवी आणि त्याची नोंद वैद्यकीय परिषदे कडे केल्याचे प्रमाणपत्रसुध्दा रुग्णालयाच्या दर्शनीभागात लावणे आवश्यक आहे.
जसे वैद्यकीय व्यावसायिकांनी आपापल्या शाखेतील उपचार करणे अपेक्षित आहे तसेच पदयुत्तर प्रशिक्षण घेतलेल्यांनीसुद्धा आपापल्या उच्च शिक्षणाच्या क्षेत्रातच विशेषज्ञ म्हणून काम करणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ जनरल मेडिसीन मधे एम. डी. असलेल्या डॉक्टरांनी स्वत:ला हृदयरोगांच्या उपचारात अधिक आवड असली तरीही स्वत:ला हृदयरोग तज्ञ म्हणवून घेऊ नये. हृदयरोग तज्ञ म्हणून वैद्यकीय व्यवसाय करण्यासाटी डी. एम. अशी पदव्युत्तर पदवी मिळवावी लागते. त्याच प्रमाणे डायबेटीस चे उपचार एम. बी. बी. एस अथवा एम. डी. मेडिसिन सुध्दा करु शकतात परंतू त्यातील तज्ञ असल्याचा दावा करण्यापूर्वी डी. एम. (एंडोक्राईनॉलॉजी) ही पदव्युत्तर पदवी मिळवायला हवी. किडनीच्या आजारांसंबंधी नेफ्रॉलोजी, कर्करोगासंबंधी ऑन्कॉलोजी, मेंदूविकारांसंबंधी न्युरॉलॉजी असे निरनिराळे पदव्युत्तर पदवी नंतर २ वर्षांचा अनुभव देणारे अभ्यासक्रम बहुतेक विद्यापीठांमधे उपलब्ध असतात.
असेच एम. डी. बालरोगशास्त्रातील तज्ञ नवजात बालकशास्त्र, बालकांतील हृदयरोगशास्र, बालकातील संप्रेरक शास्त्र अश्या निरनिराळ्या क्षेत्रात विशेषज्ञ म्हणून पदव्युत्तर प्रशिक्षण घेऊ शकतात. जनरल सर्जन झाल्यानंतर वैद्यकीय व्यावसायिक डोक्यापासून पायापर्यंत कोणत्याही भागाचे ऑपरेशन करु शकतात परंतू त्यातही न्यूरोसर्जरी, कार्डियाक सर्जरी, यूरोसर्जरी, गॅस्ट्रोएंटरॉलॉजी असे जनरल सर्जन झाल्यानंतर नंतर २ वर्षांचा अनुभव देणारे एम. सी. एच अभ्यासक्रम केल्यावर विशेष प्राविण्य मिळवता येते. ऑप्थॅल्मॉलॉजी, कान नाक घस तज्ञ आणि कॅन्सर शल्यचिकित्सा, बाल्कांवरील शल्यचिकित्सा तज्ञ असे विशेषज्ञ उपलब्ध असताना शक्यतो जनरल सर्जनने त्या क्षेत्रातील रुग्णांवर उपचार करु नयेत असे मुंबई उच्च न्यायालयाच्या एका निकालात सांगीतले आहे.
याला अपवाद म्हणजे जर एखाद्या क्षेत्रातील तज्ञ उपलब्धच नसेल आणि रुग्णाला तातडीच्या सेवेची गरज असेल तर आणिबाणिच्या परिस्थितीत डॉक्टर रुग्णावर आपल्या प्रशिक्षणाबाहेरील उपचार करु शकतात. उदाहरणार्थ एखाद्या खेडेगावात प्रसूतीत अडथळा आला असेल तर एम. बी. बी. एस. डॉक्टर सिझेरियन करुन त्या महिलेची सुटका करु शकतात. काही वर्षांपर्यंत अशी गरज होती, परंतू आता एम. डी. स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर बहुतेक ठिकाणी उपलब्ध असतात.
आपण वैद्यकीय उपचार करुन घेण्यापूर्वी डॉक्टरांच्या वैद्यकीय शिक्षण आणि प्रशिक्षणाबद्दल माहिती करुन घेणे अत्यावश्यक आहे. डॉक्टरांनी देखील "जेनो काम तेनो थाय, बीजा करे सो गोता खाय" हे लक्षात ठेवावे. म्हणजेच आपल्या कौशल्याप्रमाणे आपण रुग्णांवरच उपचार करावेत, प्रशिक्षणाबाहेर केलेले उपचार कधी कधी अती मह्त्वाकांक्षी ठरतात. म्हणतात ना आंथरुण पाहून पाय पसरावे..!!
डॉ. राजीव जोशी.
लेखक एम. बी. बी. एस, एम. डी(बालरोगतज्ञ) आहेत. त्यांनी एल. एल. बी. चा अभ्यासक्रम पूर्ण केला असून न्याय-वैद्यकीय सल्लागार म्हणून काम करतात.
Comments
Post a Comment