कायदा आणि वैद्यकीय व्यवसाय : (२)
प्रथम आपण हे लक्षात घेऊ की वैद्यकीय व्यावसायिकाने स्वत: जाणीवपूर्वक निर्णय घेऊन मानवजातीला नि:स्वार्थी सेवा देण्याचा मार्ग निवडला आहे. रुग्णांचे हित ह्याच उद्देशासाठी त्याने वैद्यकीय व्यवसायात पदार्पण करताना हिपोक्रॅटिस शपथ घेतलेली असते. अर्थात प्रत्येक व्यक्तीला आपले आयुष्य जगण्यासाठी अर्थार्जन करणे क्रमप्राप्त असल्याने वैद्यकीय व्यावसायिकाने सर्व रुग्णांवर मोफत उपचार करावेत अशी अपेक्षा या हिपोक्रॅटीस शपथेत नाही हे सुद्धा तितकेच महत्वाचे आहे.
वैद्यकीय व्यावसायिकाने आपला व्यवसाय योग्यप्रकारे करावा यासाठी अनेक कायदे बनवण्यात आले आहेत. कायदा म्हणजे लोकप्रतिनिधींनी अथवा सक्षम अधिकार्याने तयार केलेले व समाजावर बंधनकारक असलेले नियम ज्यांचा उद्देश जनहितार्थ असतो व त्यांचे पालन न केल्यास तुरुंगवास किंवा दंड किंवा दोन्ही स्वरुपात शिक्षा संभवते.
वरील विवेचनावरुन असे लक्षात येईल की वैद्यकीय व्यवसाय आणि कायदा, एका व्यक्तीच्या आणि समाजाच्या हितासाठी एकमेकांशी संलग्न आहेत. कायद्याचे पालन करण्याबरोबरच वैद्यकीय व्यवसायिकाकडून सामाजिक मूल्यांची आणि नैतिक तत्वांची अपेक्षा असल्यामुळे वैद्यकीय व्यवसायाला उदात्त व्यवसाय म्हटले जाते.
आता आपण वैद्यकीय क्षेत्रासंबंधी भारतातली परिस्थिती पाहू. सरकारी वैद्यकीय सेवा खूप कमी प्रमाणात आहे. फक्त २०% जनता सरकारी दवाखाने आणि रुग्णालयात उपचार घेत असली तरी तेथे खूप गर्दी आहे आणि डॉक्टरांवर कामाचा खूप ताण आहे. तेथे रुग्णांना मोफत सेवा आहे परंतू तेथे काम करणार्या डॉक्टर्स, नर्सेस आणि इतर कर्मचार्यांना सरकार पगार देते.
८०% जनतेवर उपचार खाजगी दवाखाने व रुग्णालयांमधे केले जातात जेथे सरकार डॉक्टरांना, नर्सेसना आणि इतर कर्मचार्यांना कोणताही मोबदला अथवा सुविधा देत नाही. त्यामुळे तेथे काम करणार्या डॉक्टरांना रुग्णांकडून फी स्वरुपात मोबदला मिळवणे क्रमप्राप्त आहे. रुग्णालयांना नर्सेस, इतर कर्मचारी यांच्या पगाराबरोबर स्वच्छता, वीज, पाणी, कर्जावर द्यावयाचे व्याज, उपकरणांची देखभाल, दुरुस्ती, नवनवीन तंत्रज्ञानाच्या उपकरणांची खरेदी इत्यादी अनेक खर्च करायचे असतात आणि व्यवसाय नफ्यात चालवायचा असतो. डॉक्टरांची फी त्यांच्या अनुभवावरुन ठरते तर रुग्णालयांचे बील तेथील अत्याधुनिक सुविधांच्या हिशोबाने ठरते.
छोट्या रुग्णालयात जाऊन पंचतारांकित सुविधांची अपेक्षा करणे चुकीचे आहे. रुग्णांनी उपचार घेताना आपल्याला कोठे उपचार घ्यायचे आहेत ते ठरवावे. छोट्या रुग्णालयातील अनुभवी डॉक्टरांपासून ते मोठ्या रुग्णालयातील शिकाऊ डॉक्टरांपर्यंत आणि संस्थात्मक रुग्णाल्यातील प्रशिक्षित डॉक्टरांपर्यंत अनेक पर्याय उपल्ब्ध असतात. त्यातील कोणता पर्याय निवडावा यासाठी आपल्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
पूर्वी फॅमिली डॉक्टर म्हणजे कुटुंबातील एक सदस्यच असायचा. त्याला सर्व कुटुंबाची त्यांच्या शेजार्यापाजार्यांची नीट माहिती असायची. परंतू वैद्यकीय ज्ञान जसजसे वाढत गेले तसतसे स्पेशॅलिस्ट आणि सुपर-स्पॅशॅलिस्ट डॉक्टरांची गरज वाढत गेली आणि फॅमिली डॉक्टरांऐवजी तज्ञांकडे जाण्याचा कल वाढू लागला. एका तज्ञा कडून दुसर्या तज्ञा कडे जाताना मधे फॅमिली डॉक्टरकडे जाण्याची गरज लोक विसरले आणि इथेच खाजगी वैद्यकीय सेवेमधील विश्वासाची जागा अविश्वासाने घेतली. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे एका बाजूला वैद्यकीय असाक्षरता आणि दुसर्या बाजूला माहितीच्या मायाजालच्या वापरामुळे मिळणारी पण न समजणारी माहिती यामुळे लोकांना आपल्या आजाराबाबत नक्की काय करायला हवे हे समजत नाही. फॅमिली डॉक्टरचे महत्व रुग्णाबरोबरच समाजासाठी आहे. वैद्यकीय व्यवसायावरील विश्वास कमी होण्याचे मुख्य कारण म्हणजे फॅमिली डॉक्टरांची संस्था नष्ट होत आहे.
Comments
Post a Comment